SLIDE1

'हरि'त'ग्राम'



भारत हा आजही शेतीप्रधान देश आहे यात वादच नाही. आणि जवळजवळ ७०% लोक गावात राहून शेती करत आहेत. महात्मा गांधीजींनी म्हटल्या प्रमाणे "India lives in its Villages". पण दिवसेंदिवस हे चित्र बदलत चालले आहे. गावांची संख्या कमी होत नसली तरी शहरे वेगाने पसरत चालली आहे. १० वर्षापूर्वी असलेला हाट (आठवडा बाजार) आज शहर म्हणून घोषीत होत आहे. कारण गावातले लोक हे शेतीकडे पाठ फिरवून त्याच शहर झालेल्या गावात का होईना पण तुटपुंज्या पगारासाठी नोकरी करू लागले आहेत.  आजच्या तरूणाबद्दल काय बोलू. त्याच्याबद्दलही बरच काही बोलायचे आहे. पण शेतीतल्या मर्यादा न पाळल्यामुळे होणारे तोटे आधी आपल्याला बघायचे आहेत.

एके काळी शेती मध्ये राब-राब राबणारा शेतकरी  आज परिश्रम करायला कुचरतो आहे. पारंपारिक पद्धतीने शेती करायला त्याला आवडेल पण तरूण पिढीने पाठ फिरवली आणि मजूरही दुर्मिळ झाले त्यामुळे बिचारा आधुनिक पण बर्‍याच अंशी घातक अशा तंत्रज्ञानाच्या अधिन झाला आहे.

आधुनिक यंत्रे आणि अवजारे त्याची अंगमेहनत कमी करत आहेतच, पण तरी सुद्धा सबूरी नसल्यामुळे आणि अतिहव्यासापोटी पिकांवर रासायनिक खतांचा आणि औषधांचा मारा करित आहे. तो भरघोस आणि जलद उत्पादनमिळवण्याच्या नादात तंत्रज्ञान वापरण्याची 'मर्यादा' विसरून गेला आहे. ह्या मर्यादेची जाणिव नक्कीच आहे त्याला, पण प्रगत जगासोबत त्यालासुद्धा धावायचे आहे.भले पुढच्या पिढीने भाकरीसाठी इतरांच्या तोंडाकडे बघितले तरी चालेल.

हे कुठेतरी थांबवायला हवे, नाहीतर एक दिवस असा येईल की आज सुपीक असणारी जमीन उद्या तंबाखूच्या शेतीसाठी पण उपयोगी पडणार नाही.