SLIDE1

Thursday, March 10, 2011

ओळख भारताची


तडपाये तरसाये रे......
८ जानेवारी २०११ वेळ पहाटे ७:०० स्थळ: दिल्ली (सरिताविहार)
हुश्श्श! ह! ह! ह!! नक्की हिटर लावलाय की एसी अशा संभ्रमात मी एक हाथ रजईच्या बाहेर काढला आणि हिटरचे चालू असलेले बटण परत ऑन करायला गेलो. आग लागो त्या थंडीला अशी चिडचिड करूनच पांघरूण बाजूला सारले आणि ताडकन उठून बाथरूम मध्ये गेलो. बॉईलर ऑन केला तरी आंघोळ करायचा मूड होईनाच! ह्या थंडीचे वर्णन मला करायला आवडेल पण आत्ता नको. खरच पण फार मजेशीर थंडी होती. अप्पर आणि बॉटम थर्मल्स त्यावर टी-शर्ट आणि जीन्स चढवली, पण तरीही थंडी आवाज करतच होती. हूडवाले एक जॅकेट, हातात ग्लोव्ज असं संपूर्ण शरीर बंद केल्यावर कुठे चालायची हीम्मत झाली. त्यात अजून एक मोठे दिव्य पार पाडायचे होते, दिल्लीवाले हा ऑप्शन शेवटी ठेवतात मी मात्र मुंबईच्या सवयीप्रमाणे सर्वात आधी. ते दिव्य म्हणजे ऑटो रिक्षाने १२-१५ किमी अंतर कापायचे. मेट्रो ने जायचे म्हटले की एवढ्या वेळा ती बदलणार कोण? हा प्रश्न आधीच सतावतो. म्हणून हा ऑप्शन आधीच स्कीप.

अरे हो मी सांगायलाच विसरलो की कुठे चाललो ते. मी, स्वाती आणि कमल जोशी असे तिघे चाललो होतो एका पोस्ट-कॅम्पेन सर्वे साठी शेतकर्‍यांशी चर्चा करायला. ठिकाण होते राजस्थानच्या अलवार जिल्ह्यातील अकबरपूर गाव.
थंडी चालू काम बंद
रिक्षाचा आवाज वाजणार्‍या थंडीपुढे ऐकूच येत नव्हता. पिठूळ धुके आणि आपल्या तीक्ष्ण नखांनी बोचणारा वारा असा समिश्र वेदनांचा आस्वाद घेत मी सराई रोहिला स्टेशन वर पोहचलो. एरवी शा पहाटे पक्षांचा किलबिलाट ऐकू येतो पण चहावाल्याचा चमचा हे सगळं ऐकायला तयार पाहिजे ना! स्टेशनबाहेरचा उकळता चहा पोटात टाकला पण तोही थंडच पडला. शेवटी तोंडाने धूर उडवत स्टेशन वरच्या पुलावर चढलो कारण एवढ्या सकाळी विचारू कुणाला की ही गाडी कोणत्या फलाट वर येते ती. 


अगदी २-२ डब्याच्याच गाड्या उभ्या होत्या बाकीचे डब्बे धुकोबाने खाऊन टाकले होते. हे क्षण टिपण्यासाठी कॅमेरा काढायचा म्हणजे अजून जीवावर यायचं. त्यात अशीच एक नजर एका खांबावर जाऊन अडकली, एरवी उंच आभाळात राहून सावज शोधणारी घार आज त्या धुकोबाची शिकार झाली होती. त्यातच एक एक डब्बा धुकोबाच्या तोंडातून बाहेर येताना दिसला आणि मला न राहवून कुडकुडत त्यातला एक पकडावा लागला. आमच्या तिघांपैकी मी पहिलाच होतो, पुढच्या स्टेशन वर स्वाती आणि त्यापुढच्या स्टेशन वर कमल असे तिघेही एकत्र बसलो. मी मात्र सकाळ पासून लॅपटॉपशी खिळून बसलो होतो. म्हणे रिसर्च करत होतो, कशावर तर बिहारच्या तरूणावर. त्यातच कमल नुकताच बिहारला जाऊन आला होता त्याला काही प्रश्न विचारले पण तशी काही मजेशीर माहिती मिळाली नाही. ते दोघे गप्पा मारत बसले होते आणि अचानक मला काहीतरी इंट्रेस्टिंग सापडल्याचा आनंद झाला. शोध म्हटलं की गूगल झिंदाबाद. NDTV ने घेतलेली बिहारी तरुणींची मुलाखत बघितली, आणि मुंबईतील घडामोडींनी उमटलेले  प्रतिसाद ऐकून अजून बरे वाटले (राजकारण वगळून फक्त देशाच्या विकासाच्या दृष्टीने मी बघत आहे). आजचा तरूण (बिहारी) जसा जागा झालाय तशीच अपेक्षा इतर प्रांतातल्या तरूणांकडून आहे. सर्वात जास्त तरुणांची लोखसंख्या असलेला बिहार शिक्षणाच्या क्षेत्रातही पुढे होता. बिहारच्या तरूणाबाबत बोलायचे झाले तर त्याच्याकडे सामान्यज्ञान अमाप आहे. पण त्याचा वापर त्याने फक्त राजकारणाच्याच हेतूने केला आहे. त्याच्याकडे क्षमता आहे पण योग्य दिशा नाही. अजूनही बर्‍याच क्षेत्रात बिहार स्वत:चे अस्तित्व टिकवून होता याची जाण त्या तरुणांना झालीय. आणि ते सर्व परत बिहारच्या पदरात पाडण्यासाठी शहराकडे धाव न घेता तिथेच राहून त्याचा विकास करण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. 

टमटम चा प्रवास
थोड्याच वेळात नेटवर्क गेले आणि मला लॅपटॉप बंद करावा लागला. तोपर्यंत आम्ही अलवार स्टेशन वर पोहचलो होतो, ११ वाजले असतील पण सकाळच्या ८ चाच भास इथेही होत होता. पराठा दही आणि डाल फ्राय असा नाश्ता केला आणि अकबरपूरला कसे जायचे या विचारात होतो. स्टेशन वरून बस डेपो १-२ किमी अंतरावर होता म्हणून तिथल्या वडापचा आसरा घेतला, शहरात वाढलेल्या आणि राहिलेल्या स्वातीसाठी हे सगळं नवीन होतं, पण तीही आता त्याची मज्जा लुटायला लागली. गाव जवळच असेल तर आपण ऑटो से चलते है अशी बढाई मारून किताना लोगे, जाकर वापस आना है. बसच्या तिकिटच्या ५० पट जास्त किम्मत ऐकून मी म्हणालो स्वाती चल तुम्हे हम गाँव की सैर कराते है असं म्हणत मोर्चा बसकडे वळविला.

वाळवंटाचा देश
राजस्थान परिवहन ची तिकीट घेण्याची पद्धत जरा वेगळीच वाटली, डेपोला तिकीट आधी घेवून चढायचे, आणि सीट नंबर प्रमाणे बसायचे. हे ठीक आहे पण प्रत्येक थांब्यावर सुद्धा हीच पद्धत पाहून मात्र आश्चर्य वाटले. त्यात कहर म्हणजे समजा एखादा प्रवाशी विनातिकीट आला तर साध्या कपड्यातला मास्तर हौजी ची कूपन फाडल्याप्रमाणे तिकीट द्यायचा. बरं! असो, आमचा प्रवास मस्त धक्के खात होत असला तरी बाहेरची हिरवी आणि पिवळी शेती बघून जोर का झटका धिरेसे लगे तसे झाले. ‘सरसोंदा खेत आणि डोंगर मात्र बोडके’. सूर्य माथ्यावरून कधी खाली सरकू लागला हे कळलेच नाही. दुपारचे दोन वाजले असतील आणि आता मात्र खरोखरच्या राजस्थानची ओळख पटू लागली. सकाळी पारा गोठवणारी थंडी तर दुपारी तापमापी फोडणारी गर्मी.


तिथल्या शेतकर्‍यांशी गप्पा मारण्यात ते दोघे व्यस्त झाले आणि मी मात्र तिथले वेगळेपण टिपण्यात दंग झालो. अवघ्या २०० मीटर वर वसलेली ती बाजारपेठ, आणि संपूर्ण गाव तिथे जमा. प्रत्येकाचे भाव वेगळेच त्यात दिल्ली वरून कुणीतरी आले म्हणून अजून आश्चर्य डोळ्यात साठवून वेगवेगळ्या नजरेने रोखून बघत होते.

शेतकर्‍यांच्या मुलाखती झाल्या, अजून कुठे जायचे की परत फिरायचे अशा विचारात दोघे असताना माझ्या मनात विचार आला तो गावाच्या सरपंचांचा. जरी तो राजकरणात असला तरी सगळ्यात जास्त माहिती (आतील/बाहेरील) त्याच्याकडेच असते. असाच एक १०-१२ युवकांचा(२० ते ३५ वयोगटातील) घोळका एका कठडयावर गप्पा मारत बसला होता. त्यातला एक काहीसा ३५ च्या घरताला मुठीत बिडी घेवून ओढत होता, एक होते साठी उलटलेले गृहस्थ आणि त्याखालोखाल सगळे असे बसले होते. एकत्र घोळका मिळाला म्हणून ग्रुप इंटरव्ह्यु घ्यायला दोघेही पुढे सरसावले, मी मात्र इकडे-तिकडे हिंडत होतो. त्यात मला एक जीप दिसली त्यावर लिहिले होते सरपंच’. मला खात्री पटली की हे इथेच कुठेतरी असणार, म्हणून त्याच घोळक्यातल्या ३५ वयाच्या गृहस्थाला विचारले यह सरपंचजी कहा है? त्याने हसून एक मस्त बिडीचा झुरका घेतला, त्याच्या तोंडातून धूर बाहेर येण्याआधीच घोळक्यातून एक जर्जर आवाज ऐकू आला यही तो सरपंचजी है’. मला माझी चूक कळली आणि मी विषय बदलण्यासाठी हात पुढे करून माझी ओळख करून दिली, आणि मुद्दयाचे प्रश्न विचारायला सुरुवात केली. बोलण्यातून काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या की सर्व शेतकरी खूप खुश आहेत, कारण शहरवासियांना रडवणारा कांदा त्यांना लक्षाधिपती करून गेला तेही अवघ्या एका महिन्यात. हा झाला त्यांच्या नशीबाचा भाग. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे, ज्या शेतकर्‍यांकडे  कमीतकमी २० बिगा (१ एकर = २.३ बिगा) शेतजमीन आहे तेच ट्रॅक्टर घेवू शकतात. त्यापेक्षा मोठे शेतकरी एकास २ किंवा ३ ट्रॅक्टर्स ठेवतात, हेच ट्रॅक्टर्स भाडे तत्वावर इतर छोट्या शेतकर्‍यांना दिले जातात. मोठे शेतकरी रासायनिक खते आणि रासायनिक कीटकनाशके व किडनाशके मोठ्या प्रमाणात वापरतात, तर छोटे शेतकरी त्याचबरोबर जैविक शेतीला प्राधान्य देतात. इथेही स्पर्धा असते बरं का! एकाने केले म्हणून त्याचे अनुकरण दूसरा करतो. (परिणाम डोळ्यांनी दिसत असेल तरच).

मिजास तारुण्याचा
इकडच्या-तिकडच्या गप्पा मारत आम्ही त्यांच्यापैकीच एक झालो. त्यात एक थोडासा तरूण आणि शिकलेला मुलगा दिसला म्हणून त्याची मते जाणून घेण्यासाठी मी त्याला आपला मित्र बनवले. त्याला म्हटले एक मस्त पोज दे मी तुझा फोटो काढतो. त्याचा फोटो काढल्यावर त्याच्याशी झालेला संवाद जशास तसा मांडत आहे. माफ करा पण त्याचे नाव मला आठवत नाही.
मी: आप कितना पढे हो?
तो: बारवी किया हू|
मी: आगे नही पढना?
तो: नही, (मी:क्यो?) काफी है उताना आगे नही पढना है|
मी: पढाई नही करोगे तो कामाओगे कैसे, आजकाल पढाई के बिना कुछ नही होता.
मी: शहर कभी गये हो?
तो: हा, २ महिनोंके लिये बम्बई मे था|
२ पिढी एका चौकटीत
मी: सिर्फ दो महिना! क्यों? अच्छी नही लगी मुंबई?
तो: नही|
त्याचे हे उत्तर ऐकून मला नवल नाही वाटले, कारण तेवढ्या वेळात मी त्याचा बायो-डाटा स्कॅन केला होता. तो नवी मुंबईच्या Central Mall मध्ये काहीतरी काम करायचा, राहायचा पण तिकडे. एखाद्या गावातून आलेला मुलगा अचानक अशा so called high society च्या दुनियेत आल्यावर मर्यादा तोडणारच ना!
मी: क्यों भाई, हर कोई मुंबई का ख्वाब देखता है और तुम हो की भाग आए|
त्याचा मुद्दा बाजूला ठेवून महत्वाच्या मुद्दयाला हात घातला
मी: एक बात बताओ, मैने सुना है की आजकल के लडके खेती नही करना चाहते. इसपे आपका क्या खयाल है?
तो: हा आजकल खेती मे क्या बचा है? मेहनत जादा और पैसा कम| इतनी मेहनत कौन करेगा? हमारे यहा तो सब लोग बारवी सिखते है और या तो नौकरी ढुंढते है या फिर कुछ बिजनेस करते है|
मी: लेकीन नये तकनिक की वजह से खेती तो अभी बिलकुल आसान हो गयी है| फिर भी आप को क्यों ऐसा लगता है?
तो: खेती में आज बोया और कल बेच दिया ऐसा तो नही होता ना? इंतजार करने के बाद भी कितना पैसा मिलेगा?
मी: तो अब आप कैसे पैसे कामाओगे, आप इतना पढे भी नही की कही अच्छी नौकरी मिल जाये|
तो: मै बिजनेस करूंगा (क्या बिझनेस?) यही कुछ दुकान चलाउंगा| (लेकीन किसी की गुलामी (नौकरी) नही करूंगा) या फिर पुलिस या फौज मे भरती हो जाऊंगा|
मी: फौज मे नौकरी मिलेगी?
तो: हा मिलेगी| नही तो बिझनेस करेंगे|

मी त्याला थॅंक्स म्हणून माझ्या टीम सोबत जाऊन बसलो, तेवढ्यात तो तरूण आमच्यासाठी चहा घेऊन आला. म्हणाला सर चाय लिजिये मी मोठ्या अदबीने म्हटले अरे! आपने क्यों कष्ट लीये. आमचा चहा पिऊन झाला आणि मी उगाच त्याचा 'बिझनेस' आहे हा विचार करत पैसे द्यायला गेलो. पण तो धावतच आला आणि म्हणाला साहब से पैसे मत लेना’ मी म्हणालो, यार तेरा पेट चलता है इसपे. आप  हमारे मेहमान है और मेहमान से पैसे नही लेते याला इतर लोकांनी पण दुजारा दिल्यावर मला पाकीट परत खिशात ठेवावे लागले.

भारताची मेहमाननवाजी आजही तंतोतंत पाळाली जाते. पण हे चित्र फक्त गावातच बघायला मिळेल. सगळ्यांचे आभार मानून आम्ही परतीच्या प्रवासास निघालो.

परतीचा प्रवास
फारच थकल्यासारखे झाले होते त्यात परत ४-५ तास प्रवास करायचा म्हणजे डोक्याला ताप. आम्ही अलवारला पोहोचलो पण परतीची तिकीट बूक केले नव्हते. बस ने जायचे की ट्रेन ने या विचारात राहून गेले होते. पण Thanks  to technology, मोबाइल वर availability चेक केली आणि स्वातीच्या भावाला तिकीट बूक करायला सांगितले. गाडीला बराच वेळ होता म्हणून तिकडच्या बिग बाजार मध्ये जाऊन वेळ घालवला, तो वेळ एवढा जास्त घालवला की ट्रेन चुकणार हे निश्चित असा विचार करूनच स्टेशन कडे धाव घेतली. एका मिनिटाने ट्रेन उशिरा आली म्हणून बरं नाहीतर रात्र अलवार मध्येच काढावी लागली असती. येतेवेळी नविसरता राजस्थानचा स्पेशल मिल्ककेक घेतला.

दिल्लीला पोहोचायला रात्रीचे २ वाजले आणि पुन्हा गडद थंडीचे पांघरून घेतलेल्या रात्रीच्या कुशीत झोपून गेलो.

Tuesday, March 8, 2011

महिलादिन विशेष

हरि ॐ!
आज ठिकठिकाणी विविध क्षेत्रातील महिलांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सन्मानले जात आहे. काही लौकिक मिळवलेल्या स्त्रियांना आदरांजलीही दिली जात आहे. आज बर्‍याच ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम सादर केले जात आहेत. संगीत क्षेत्रात स्वरामय कार्यक्रम, नृत्य क्षेत्रातील स्त्री कलाकारांना आज नृत्याविष्काराने गौरविले जात आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला हातभार लावणार्‍या Business Woman यांनाही गौरविण्यात येणार आहे. राजनीती बद्दल तर काही बोलायलाच नको. त्याचबरोबर महिला सैनिक, क्रीडाविश्वातल्या महिला, डॉक्टर, एंजिनियर्स, वकील आणि अन्य क्षेत्रातील महिलांनाही गौरविण्यात येणारच असेल.

एक अतिमहत्वाचे क्षेत्र  आपल्याला वगळून चालणार नाही. भारत आजही गावातच राहतो. गावात राहणारी स्त्री कधीच कुठल्या न्यूज चॅनेल वर झळकली नसेल किंवा साधे पेपर मध्येही तिचे नाव आले नसेल. यात काही नावीण्य नाही. आजही भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या  शेतकर्‍याची सहचारिणी म्हणून ती गेली कित्येक वर्षे खांद्याला खांदा लावून काम करते हे कधी कुणीही उल्लेखलेले नसेल. हो खरच तीला समाजात असंख्य बंधने असूनसुद्धा ती शेतीत मात्र बिनधास्तपणे राबताना दिसते. आपण म्हणतच असू की पुरुषांशिवाय शेती होत नाही (आजही शेतकरी हेच म्हणतो), पण पुरुषांपेक्षा जास्त काम ह्या स्त्रीयाच करतात. ही झाली फक्त शेतीतील कामाची कहाणी, घरातल्या संसाराच भार वेगळाच.

आजपर्यंतचा मी केलेला अभ्यास काय सांगतो बघूया त्या शेतकर्‍याच्या बायकोबद्दल
तीचा दिवस चालू होतो पहाटे ५ वाजता, एवढ्या सकाळी ती रोजच उठते. पण काय करत असेल ती?



सकाळी उठल्या-उठल्या सुरुवात होते ती न्याहरीची. चूल पेटवणे, न्हाणी घरात आंघोळीसाठी पाणी तापत ठेवणे, केर-कचरा, झाडलोट, ही कामे ती सकाळीच आटोपून घेते. लवकर उठून प्रात:विधी तीला आटपावे लागतात (ही अजून एक शोकांतिका) कारण दिवस उजाडला की या गोष्टी करणे तीला अवघड जाते. पायाखाली झुंजूमुंजू झालेले असताना नेहमीची पायवाट आहे म्हणून बिनधास्तपणे एकावर एक हांडे रचून पाणी भरत असते.




पाणी, न्याहारी, केर-कचरा अशी घरातली कामे झाली की लगेचच ती गोठयाकडे वळते तिच्या मानलेल्या लेकरांची सेवा करायला. औत जरी पुरुष जुंपत असले तरी गुरांची निगा ही स्त्रीयाच राखतात.दूध काढणे, वैरण देणे, याशीवाय गोठा चकाचक साफ करणे इत्यादी कामे ती पार पाडते.  तो पर्यन्त तीचा धनी शेताकडच्या वाटेला निघालेला असतो.

स्वत: अशिक्षीत असूनही मुलांच्या शाळेची तयारी मात्र ती वेळेवर करते. त्यांच्या आंघोळीपासून ते शाळेत सोडेपर्यंतची कामे ती करते. नवरा शेतात गेलाय, मुले शाळेत गेलीत, घरातली कामेही संपली, पण तरीही तीची घाई आहेच. कुठे जायची? नवरा सकाळी न्याहारी न करताच गेला आहे त्याला माहीत आहे की आपली बायको येईल इतक्यात. शिदोरी भरून ती निघते ती थेट शेतात. मुलांनंतर ती सर्वात जास्त जपते ती तीच्या नवर्‍याला.



सकाळ उलटून गेली, सूर्य हळूहळू वर सरकू लागतो आणि थकलेला नवरा, बायको न्याहारी घेऊन येते हे दिसताच तिच्याकडे बघत डाव्या हाताच्या अंगठ्याने कपाळावरचा घाम पुसतो आणि अजून जोमाने कामाला लागतो. ती मात्र भराभर चालत येऊन त्याला पाणी पाजते आणि 'धनी आधी खाऊन घ्या' असं म्हणत एक घास का होईना पण स्व:ताच्या हाताने भरवतेच.


कधीकधी न्याहारी आणि दुपारचे जेवण हे एकच असते. शेतातच थोडीशी विश्रांती घेऊन पुन्हा दिवसभर ती नवर्‍यासोबत राबते. दोघेही सूर्य मावळेपर्यंत शेतात काम करतात आणि पक्षी घरट्याकडे फिरलेले पाहून घराकडे धाव घेतात.



मुले शाळेतून आलेली असतात, पण तरीही तीच्या हाताला मात्र उसंत नसते. ती जेवते कधी, झोपते कधी याचा हिशोब ठेवणे अवघड आहे.


सध्याकाळच्या वेळी देवाकडे दिवाबत्ती करणे, मुलांना अभ्यासाला बसवणे, म्हैशीला आंबवण देणे, चुलीवर आदण ठेवणे, अशी अनेक कामे ती एकाच वेळी करत असते. यातच स्वयंपाक उरकून नवर्‍याला आणि मुलांना जेवायला वाढून कधीकधी टीव्ही वरची एखादी सिरियल पाहायला मोकळी होते.

अशी ही स्त्री थकून भागून उद्याची काळजी डोळ्यात साठवून झोपी जाते.
तिचा दिवस संपतो तो रात्री १० वाजता.

ही जरी अप्रगत असली तरी देशाच्या प्रगतीचा रस्ता हिनेच सारवलेल्या वाटेवरून जातो हे विसरून चालणार नाही. अशा ह्या महान स्त्रीला जागतिक महिला दिनानिमित्त अनिरुद्ध शुभेछा.

हरि ॐ!!