SLIDE1

Tuesday, March 8, 2011

महिलादिन विशेष

हरि ॐ!
आज ठिकठिकाणी विविध क्षेत्रातील महिलांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सन्मानले जात आहे. काही लौकिक मिळवलेल्या स्त्रियांना आदरांजलीही दिली जात आहे. आज बर्‍याच ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम सादर केले जात आहेत. संगीत क्षेत्रात स्वरामय कार्यक्रम, नृत्य क्षेत्रातील स्त्री कलाकारांना आज नृत्याविष्काराने गौरविले जात आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला हातभार लावणार्‍या Business Woman यांनाही गौरविण्यात येणार आहे. राजनीती बद्दल तर काही बोलायलाच नको. त्याचबरोबर महिला सैनिक, क्रीडाविश्वातल्या महिला, डॉक्टर, एंजिनियर्स, वकील आणि अन्य क्षेत्रातील महिलांनाही गौरविण्यात येणारच असेल.

एक अतिमहत्वाचे क्षेत्र  आपल्याला वगळून चालणार नाही. भारत आजही गावातच राहतो. गावात राहणारी स्त्री कधीच कुठल्या न्यूज चॅनेल वर झळकली नसेल किंवा साधे पेपर मध्येही तिचे नाव आले नसेल. यात काही नावीण्य नाही. आजही भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या  शेतकर्‍याची सहचारिणी म्हणून ती गेली कित्येक वर्षे खांद्याला खांदा लावून काम करते हे कधी कुणीही उल्लेखलेले नसेल. हो खरच तीला समाजात असंख्य बंधने असूनसुद्धा ती शेतीत मात्र बिनधास्तपणे राबताना दिसते. आपण म्हणतच असू की पुरुषांशिवाय शेती होत नाही (आजही शेतकरी हेच म्हणतो), पण पुरुषांपेक्षा जास्त काम ह्या स्त्रीयाच करतात. ही झाली फक्त शेतीतील कामाची कहाणी, घरातल्या संसाराच भार वेगळाच.

आजपर्यंतचा मी केलेला अभ्यास काय सांगतो बघूया त्या शेतकर्‍याच्या बायकोबद्दल
तीचा दिवस चालू होतो पहाटे ५ वाजता, एवढ्या सकाळी ती रोजच उठते. पण काय करत असेल ती?



सकाळी उठल्या-उठल्या सुरुवात होते ती न्याहरीची. चूल पेटवणे, न्हाणी घरात आंघोळीसाठी पाणी तापत ठेवणे, केर-कचरा, झाडलोट, ही कामे ती सकाळीच आटोपून घेते. लवकर उठून प्रात:विधी तीला आटपावे लागतात (ही अजून एक शोकांतिका) कारण दिवस उजाडला की या गोष्टी करणे तीला अवघड जाते. पायाखाली झुंजूमुंजू झालेले असताना नेहमीची पायवाट आहे म्हणून बिनधास्तपणे एकावर एक हांडे रचून पाणी भरत असते.




पाणी, न्याहारी, केर-कचरा अशी घरातली कामे झाली की लगेचच ती गोठयाकडे वळते तिच्या मानलेल्या लेकरांची सेवा करायला. औत जरी पुरुष जुंपत असले तरी गुरांची निगा ही स्त्रीयाच राखतात.दूध काढणे, वैरण देणे, याशीवाय गोठा चकाचक साफ करणे इत्यादी कामे ती पार पाडते.  तो पर्यन्त तीचा धनी शेताकडच्या वाटेला निघालेला असतो.

स्वत: अशिक्षीत असूनही मुलांच्या शाळेची तयारी मात्र ती वेळेवर करते. त्यांच्या आंघोळीपासून ते शाळेत सोडेपर्यंतची कामे ती करते. नवरा शेतात गेलाय, मुले शाळेत गेलीत, घरातली कामेही संपली, पण तरीही तीची घाई आहेच. कुठे जायची? नवरा सकाळी न्याहारी न करताच गेला आहे त्याला माहीत आहे की आपली बायको येईल इतक्यात. शिदोरी भरून ती निघते ती थेट शेतात. मुलांनंतर ती सर्वात जास्त जपते ती तीच्या नवर्‍याला.



सकाळ उलटून गेली, सूर्य हळूहळू वर सरकू लागतो आणि थकलेला नवरा, बायको न्याहारी घेऊन येते हे दिसताच तिच्याकडे बघत डाव्या हाताच्या अंगठ्याने कपाळावरचा घाम पुसतो आणि अजून जोमाने कामाला लागतो. ती मात्र भराभर चालत येऊन त्याला पाणी पाजते आणि 'धनी आधी खाऊन घ्या' असं म्हणत एक घास का होईना पण स्व:ताच्या हाताने भरवतेच.


कधीकधी न्याहारी आणि दुपारचे जेवण हे एकच असते. शेतातच थोडीशी विश्रांती घेऊन पुन्हा दिवसभर ती नवर्‍यासोबत राबते. दोघेही सूर्य मावळेपर्यंत शेतात काम करतात आणि पक्षी घरट्याकडे फिरलेले पाहून घराकडे धाव घेतात.



मुले शाळेतून आलेली असतात, पण तरीही तीच्या हाताला मात्र उसंत नसते. ती जेवते कधी, झोपते कधी याचा हिशोब ठेवणे अवघड आहे.


सध्याकाळच्या वेळी देवाकडे दिवाबत्ती करणे, मुलांना अभ्यासाला बसवणे, म्हैशीला आंबवण देणे, चुलीवर आदण ठेवणे, अशी अनेक कामे ती एकाच वेळी करत असते. यातच स्वयंपाक उरकून नवर्‍याला आणि मुलांना जेवायला वाढून कधीकधी टीव्ही वरची एखादी सिरियल पाहायला मोकळी होते.

अशी ही स्त्री थकून भागून उद्याची काळजी डोळ्यात साठवून झोपी जाते.
तिचा दिवस संपतो तो रात्री १० वाजता.

ही जरी अप्रगत असली तरी देशाच्या प्रगतीचा रस्ता हिनेच सारवलेल्या वाटेवरून जातो हे विसरून चालणार नाही. अशा ह्या महान स्त्रीला जागतिक महिला दिनानिमित्त अनिरुद्ध शुभेछा.

हरि ॐ!!

1 comment:
Write comments
  1. हे अस आहे म्हणूनच आपल्या देशात स्त्री ला दैवता इतका मान दिला जातो.

    भारतवर्षात घडलेल्या पराक्र्मी स्त्रीयांना मानाचा मुजरा...

    ReplyDelete